single-post

ई-मेल म्हणजे काय?

Sun 28th Oct 2012 : 11:28

ई-मेल चे पुर्ण नाव इलेक्ट्रॉनिक मेल (Electronic mail). ई-मेल म्हणजे म्हणजे कॉम्प्युटरद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा पत्रव्यवहार. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपण आपली पत्रे म्हणजेच ई-मेल साठवू शकता (save), त्यांना प्रत्युत्तर देणे (reply) तसेच ते दुसऱ्यांना पाठविणे (forward) या गोष्टी येतात. ई-मेल हा इंटरनेटवरील नेटवर्कद्वारे एकमेकांना जोडलेल्या सर्व्हरद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविला जातो.


ई-मेलमध्ये १) ई-मेल पाठविणाऱ्याचा ई-मेल पत्ता, २) ज्याला ई-मेल पाठवायचा असेल त्याचा ई-मेल पत्ता, ३) विषय, ४) ई-मेल चा मजकूर (body) या चार गोष्टी प्रामुख्याने काम करतात. ई-मेल च्या निर्मितीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त याच चार गोष्टींपुरता मर्यादित असलेल्या ई-मेलमध्ये नंतर निराळी अतिरीक्त फाईल जोडण्याची (attachment) सेवा देखिल जमा झाली.


थोडक्यात आपण ज्याप्रकारे कागदावर पत्र लिहून ते पाकिटामध्ये भरुन त्यावर ज्याला पत्र पाठवायचे असते त्याचा पत्ता लिहून ते पाकिट पोस्टामध्ये देतो मग ते आपले पत्र असलेले पाकिट ३-४ दिवसांमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला मिळते. अगदी त्याच प्रकारे पण अतिशय जलद, सोपे, सुरक्षित पत्र पाठविण्याचे सध्याचे माध्यम म्हणजे ई-मेल.


ई-मेल ही एक कॉम्प्युटरद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून पत्र पाठविण्याचे सेवा आहे. आपल्याला जर कुणाशी फोनवर बोलायचे असेल तर ज्याप्रमाणे आपल्याकडे फोन असणे आवश्यक आहे. तसेच ज्याला फोन करायचा असेल त्याच्याकडे देखिल फोन असून त्याच फोन क्रमांक आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे आपल्याला जर कुणाला ई-मेल पाठवायचा असेल तर आपल्याल प्रथम आपला ई-मेल तयार करावा लागेल, नंतर मग आपण आपल्या ई-मेल खात्यामधून दुसऱ्याच्या त्याच्या ई-मेल पत्त्यावर ई-मेल पाठवू शकता. यासाठी आपल्याला त्या दुसऱ्याचा ई-मेल पत्ता माहित असणे आवश्यक आहे.


सध्या ई-मेल ही एक मोफत सेवा आहे. जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या सारख्या वेबसाइट आपल्याला आपला मोफत ऑनलाईन ई-मेल देतात. मग आपण त्यांच्या वेबसाइटद्वारे आपले ई-मेल पाहू शकतो तसेच इतरांना ई-मेल पाठवू शकतो. ऑनलाईन ई-मेल म्हणजे आपण जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ वेबसाइटद्वारे जगभरातून कुठूनही आपले ई-मेल खाते वापरु शकता. (टीप: अशाप्रकारे मोफत ई-मेल सेवा देणे म्हणजे जाहिरातीद्वारे उत्पन्न हे त्यामागचे कारण असते.)


जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या प्रमाणे जगभरामध्ये मोफत ऑनलाईन ई-मेल सेवा देणाऱ्या शेकडो वेबसाइट आहेत. परंतू भारतामध्ये या चार वेबसाइट प्रसिद्ध आहेत. आपण ज्या वेबसाइटवर आपला मोफत ई-मेल चालू करता तेव्हा आपल्या ई-मेल पत्त्यामध्ये त्या-त्या वेबसाइटचे नाव मागे दिलेले असते. उदा. समजा सचिन पिळणकर व आपला ई-मेल याहू या वेबसाइटवर असेल तर आपला ई-मेल पत्ता ganeshkumar@yahoo.com असा असेल वर जर आपला ई-मेल हॉटमेलवर या वेबसाइटवर असेल तर आपला ई-मेल पत्ता ganeshkumar@hotmail.com असा असेल.


प्रत्येक ई-मेल मध्ये @  हे चिन्ह वापरलेले असते. या चिन्हाद्वारे ई-मेल वापरणाऱ्याचे नाव आणि ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइटचे नाव विभागले जाते. जसे huiok99@gmail.com  या ई-मेलमध्ये huiok99 हे वापरलेले नाव ज्यालाच युजरनेम असे देखिल म्हणतात, तर gmail.com हे ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइटचे नाव ज्याला होस्टनेम (host name) असे म्हणतात.

ई-मेल म्हणजे काय?

comments (Only registered users can comment)

comments

user