single-post

‘नकुशी’ नावात काय आहे?

Tue 20th Nov 2012 : 06:18

काही दिवसांपूर्वी एका सरकारी कार्यक्रमातून ४०० मुलींचे ' नकुशी ' हे नाव बदलण्यात आले . मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव ' नकुशी '! ही केवळ तिच्या आईवडिलांचीच भावना नसून संपूर्ण समाजाचा स्त्रीजन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आहे . एखाद्या स्त्रीला जन्मापासूनच ' तू कोणालाही नकोशी वाटतेस ' असे आयुष्यभर जाणवून देणे ही किती भयानक शिक्षा आहे.

मानसिक छळ हा फक्त सासरीच होतो , असा एक सार्वत्रिक गैरसमज . परंतु जन्मदातेच जेव्हा मुलीला ' जत्रेत हरवून ' पोरकी करतात , तेव्हा तिच्या आयुष्यात फक्त शारीरिक आणि मानसिक असुरक्षितताच भरून राहते . ' मुलगी दिली तिथे मेली ' असे म्हणत . त्यानंतर ' कन्या हे परक्याचे धन '. आता मुली शिक्षित , कमावत्या असल्या तरी ' इथे आहेस , तोवरच हे लाड , बरं !' असे उद्गार ऐकले की एकच गोष्ट तिच्या मनावर कोरली जाते - ' हे घर कायमचे माझे नाही !'

लग्न ठरवताना एखादीला अनेकांकडून नकार ऐकावा लागतो , केवळ रूप पाहून . मग तिच्या मनमिळावू स्वभावाचा , बुद्धिमत्ता , कर्तृत्वाचा विचारही केला जात नाही . त्यामुळे तिचा आत्मविश्वास ढासळतो . याउलट एखादीने तिला न आवडणाऱ्या मुलाला नकार दिला , तर तिच्यावरच अॅसिडफेक होते . तिला नकाराधिकार नाही !

लग्न होऊन मुलगी सासरी येते , तेव्हा तिचे घर , त्यातील माणसे , त्यांचे स्वभाव , राहणीमान , काम करण्याची पद्धत असे सगळेच बदलते . या बदलाची सवय होण्यासाठी तिला वेळ देण्याची , सांभाळून घेण्याची आवश्यकता असते . त्यामुळे तिचे दिसणे , स्वयंपाक , अन्य कामे इथपासून ते तिला तीन मुलीच झाल्या इथपर्यंत कोणत्याही कारणाने तिला मानसिक त्रास दिला जातो . यात टोमणे , माहेरच्यांचा उद्धार , अपमान , दुर्लक्ष अशा लहान वाटणाऱ्या , पण मोठ्या गोष्टी येतात . मुलगा होण्यास शास्त्रीयदृष्ट्या बाप जबाबदार असला , तरी घराला सून नकोशी होते . कधी तिला घराबाहेर काढले जाते किंवा ती रोज तीळ - तीळ मरत राहते किंवा आत्महत्या करते . म्हणजे माहेरही तिचे नाही आणि सासरी ती कोणाची नाही ...

ऐन उमेदीची २५ - ३० वर्षे संसारासाठी खर्ची घातल्यानंतरही एखाद्या स्त्रीला घरातील निर्णय घेताना गृहीत धरले जाते . तिची आवड , मत विचारात घेतले जात नाही . वर ' तिने विशेष काय केले ,' असे म्हणतात . अशा वेळी तिच्या मनाची अवस्था काय होत असेल ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२च्या अहवालानुसार नैराश्याने ग्रासण्याचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना ५० टक्के अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे . म्हणूनच आपल्या आजुबाजूच्या स्त्रियांपैकी एखादीला कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास होत असेल , तर तिचे मन मोकळे व्हावे यासाठी सुसंवाद साधणे , समुपदेशकाकडे वा मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणे , तिच्या आवडीचे काही करण्यास उद्युक्त करणे , तिला छंद जोपासण्यास मदत करणे उपयुक्त ठरते . लहानपणापासून मुलगी भावनिकदृष्ट्या परावलंबी होणार नाही , यासाठी प्रयत्न करायला हवेत . तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि कणखर बनेल , याकरिता प्रयत्न केले पाहिजेत . घरातील निर्णयप्रक्रियेत तिला स्थान मिळाले पाहिजे . शालेय शिक्षणापासून जेव्हा स्त्रीपुरुष समानतेची शिकवण दिली जाईल , कुटुंबातील स्त्रीला आदराने वागवले जाईल , तेव्हाच ' नकुशी ' चे नाव बदलण्याला खरा अर्थ प्राप्त होईल .
स्नेहा पंडित ( भारतीय स्त्री शक्ती )

‘नकुशी’ नावात काय आहे?

comments (Only registered users can comment)

comments

user